Saturday, April 18, 2015

नोव्हेंबर महिना नुकताच सुरु झाला होता.  बघता बघता दिवाळी तोंडा वर येउन ठेपली होती.  दिवाळी म्हणलं कि छान रोषणाई वगरे आणि शाळकरी मुलांचा अगदी आवडता सण.  रस्त्यांवर खरेदी साठी गर्दीचे लोट वाहत होते. रस्त्यावरून फिरताना लहान मुलांचे हट्ट कानावर पडत असत. दुकानांमध्ये सवलतींच्या जणू स्पर्धाच लागल्या होत्या.  दिवाळी सामान  विक्रेते, फटाक्यांची दुकाने वगरे ह्यांनी रस्ते सर्वत्र फुलत होते. काही लहान मुलांनी तर दिवाळी येण्या आधीच फटाके उडवायला सुरवात केली होती. दिवाळीची सुट्टी आता लागणार असल्याने कर्मचारी देखील सहलींच्या चर्चेत गुंतले होते.  कॉर्पोरेट क्षेत्रात आल्या पासून दिवाळीचे महत्वच बदलत गेले आहे. शाळेत होतो तेव्हा कधी एकदा सुट्टी लागतीये आणि आम्ही खेळायला जातोय वगरे वगरे पण आता कधी सुट्टी लागतीये आणि मी मस्त आराम करतोय.  काळ थांबत नाही हेच खरे.

आज शुक्रवार. उद्या पासून पुढच्या रविवार पर्यंत सुट्टी या नुसत्या विचारानेच मन उड्या मारत होते. सगळे पुढचे विचार डोक्यात घोळत होते. तेवढ्यात आमच्या आईचा फोन आला.  "अरे, आज संध्याकाळी येताना कुंभारवाड्याच्या इथून पणत्या घेऊन ये जरा". मी जरा वैतागलोच. एक तर आज शुक्रवार त्यात एक आठवडा भर सुट्टी. कधी एकदा घरी जाऊन मित्रांबरोबर टवाळक्या करतोय हे बघत होतो आणि त्यात आईने कामाला लावले. पण म्हणलं जाऊदेत, माझ्या वाटेवरच आहे, जाऊ घेऊन. कसे तरी तास रेटले आणि ऑफिस मधून पळ काढला. सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा वगरे दिल्या. कंपनीने पण फुल ना फुलाची पाकळी म्हणून काहीतरी मिठाई दिली सर्व लोकांना. रस्त्यावर गर्दीचे नुसते लोट वाहतच होते. खूप लोकं आपल्या आपल्या गावाला निघाले होते त्यामुळे सर्वत्र गर्दी. चालायची देखील सोय नव्हती. कंपनीच्या बस मधून म.न.पा. पाशी उतरलो आणि कुंभारवाड्या कडे निघालो. रस्त्यावरची गर्दी बघत, लहान मुलांचे हट्ट बघत रमत गमत मस्त पैकी चाललो होतो. उद्या पासून आता काय करायचे डोक्यात विचार चालले होते. पोरांना मेसेज टाकले होते काही तरी ठरवा म्हणून. शेवटी एकदाचा पोहोचलो कुंभारवाड्यात. खूप गर्दी होती. कसेतरी वाट शोधत पणत्या घेतल्या आणि घरा कडे निघालो.

छान सुर्य मावळतीला आला होता. मस्त मावळत्या सूर्याच्या प्रकाशाने उत्साही वातावरण होते. दुकाने दिव्यांच्या माळांनी सजली होती. दारोदारी आकाशकंदील झोकत होते. फडके हौदा पाशी आलो. तो भाग कायमच गजबजलेला आणि दिवाळी म्हणाल्यावर विचारायलाच नको. पादचारी आणि गाडी वाले ह्यांची एकच गर्दी झाली होती आणि पोलिस मामांची पुरती वाट लागली होती. फडके हौदा पाशी दिवाळीचे सामान, किल्ल्यांसाठी मावळे वगरे विकणारे खूप असतात. आणि मला ते लहानपणा पासून कायमच बघायला आवडायचे. मी स्वतः विशेष किल्ला नाही करायचो कारण येतच नव्हता मला करता. पण कोणी करताना बघायला किंवा त्याच्या बरोबर करायला कायम आवडत असे. लहान मुलांची गर्दी खूप होती प्रत्येक दुकानाबाहेर.  मावळे सगळे दिसायला सारखेच पण त्यांचे नामकरण लहान मुलं करत होते. "काकू, तो तानाजी कितीला?, काका, मला हे मावळे द्या. आणि हे प्राणी पण." दोन मिनिटे मी पण त्या मुलांच्या मागे उभा राहून मजा पाहत होतो. काही ठिकाणी तयार असलेले किल्ले पण दिसत होते विक्रीला. ते पाहून तर मला हसूच आले. माझ्या सारख्या लोकांचा ह्यांनी प्रश्नच मिटवला अशी मिश्किल प्रतिक्रिया देऊन मी मोकळा पण झालो. वास्तविक त्या मुलांना शिवाजी महाराज नक्की कोण होते, त्यांनी नक्की काय केलं ह्याची कल्पना असली तरी आनंदच मानला पाहिजे. पण त्यांच्या उत्साहाला दाद मात्र दिलीच पाहिजे.

अशातच एक लहान मुलाने त्याच्या वडलांना प्रश्न विचारला आणि नेमकी तो प्रश्न माझ्या कानावर पडला. तो प्रश्न इतका सुंदर, निष्पाप आणि विचार करायला लावण्या सारखा होता. त्या प्रश्नाने त्याचे वडील जितके चक्रावले तितकाच मी देखील. त्याने अगदी सहज विचारले "बाबा, किल्ला कायम दिवाळीतच का करायचा". त्याच्या वडलांना काही सुचले नाही मिनिटे. त्यांनी काहीतरी विचार करून वेळ मारून नेह्ण्यासाठी सांगितलं कि "तुम्हाला आता दिवाळीची सुट्टी असतेना, मग काहीतरी तुमचा वेळ जावा म्हणून" पण पोरगं वस्ताद. "सुट्टी तर मे महिन्यात पण असते आणि जास्त असते, मग तेव्हा का नाही करत". शेवटी वडलांनी वैतागून "मला नाही माहित म्हणून विषयावर पडदा पाडला". वास्तविक त्या मुलाच्या म्हणण्यात खूप तथ्य होते. खरतर मला पण प्रश्न पडला "अरे हो कि, लहान पणा पासून किल्ला किल्ला करत आलो दिवाळीत पण दिवाळीतच का करतात हा प्रश्न कधी पडला नाही". त्या मुलाने कळत डोक्यात भुंगा सोडून दिला.

घरी जाई पर्यंत मी त्याचाच विचार करत होतो. कंपनीतून मी काय विचार करत बाहेर पडलो होतो आणि आता काय विचार करत घरी आलोय ह्यात पुरता जमीन अस्मानाचा फरक होता. घरी आल्या आल्या पहिले मी घरच्यांना विचारले पण त्यांना देखील माहित नव्हते. त्यांनी पण अशीच उडवा उडवीची उत्तरे दिली. जेवणे झाली. आम्हा मित्रांचे भेटायचे ठरलेलेच होते. सगळे कट्ट्यावर जमले. सगळ्यांच्या गप्पा सुरु झाल्या होत्या. मी असून नसल्या सारखा होतो. मी मध्येच सगळ्यांना थांबवून विचारले कि कोणाला माहिती आहे का कि किल्ले आपण कायम दिवाळीतच का करतो? सगळे मिनिटे चाट पडले. जसा मी पडलो होतो. सगळ्यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले पण काही थांग पत्ता लागेना. पण तो विषय लगेच बदलला गेला. पण मला मात्र शेवट पर्यंत चैन पडेना. शेवटी घरी आल्यावर गुगल भाऊ झिंदाबाद. गुगल नामक प्रकरणाने जीवन अगदी सोप्पे बनवून ठेवले आहे.

मग मी माहिती शोधू लागलो. आणि सकाळ टाईम्स नामक वेबसाईट वर एकदाची माहिती मिळाली.  इतिहासकार मंदार लवाटे ह्यांनी ह्या माहितीचा शोध घेतला आणि त्यांनी खोलात जाऊन माहिती मिळवली  कि "एकेकाळी गायींच्या शेणाचे किल्ले बनवत असत. आणि त्यावर दुर्वा, फुले वगरे वाहून पूजा केली जात असे. त्याच बरोबर असे मानले जायचे कि कार्तिक महिन्यात जर ज्याने कोणी चांगली कर्म किंवा पराक्रम केले असतील आणि त्यांची पूजा नाही केली गेली तर ते व्यर्थ जाईल. मग किल्ले निवडण्याचे कारण हे कि किल्ले हे मराठ्यांची ताकद होती आणि शौर्याची निशाणी. मराठ्यांना किल्ल्यांबद्दल अभिमान वाटत असे. एवढेच नव्हे तर शिवाजी महाराज देखील त्यांच्या लहानपणी किल्ले बनवत असे त्यामुळे ते देखील कारण असू शकते"

रात्रीचे ११ वाजले होते. अतिशय सुंदर अशी माहिती मिळाली होती. उशिरा का होईना पण मिळाली. आता डोक्यातला भुंगा जरा शांत झाला होता. पण डोक्यात दुसरे चक्र सुरु झाले. प्रश्नांचा हलकल्लोळ माजला होता. इतिहास आणि वास्तव ह्यांचा काही ताळमेळ लागत नव्हता. किती गंमत आहे ना, महाराजांच्या नावाचे नुसते जयजयकार करणारे लोक दिसतात, त्यांच्या जयंती कधी पुण्यतिथी कधी त्यावरून वाद. आता कोणाला महाराजांनी किती किल्ले जिंकले रे बाबा ठाऊक आहे का असे विचारायची देखील पंचायत आहे. कारण नुसते शिवाजी महाराज म्हणले कि आमच्या तोंडातून जय एवढच येतं.

तो लेख वाचताना अजून एक माहिती मिळाली कि १८१८ मध्ये इंग्रज आले आणि त्यांनी सगळे किल्ले काबीज केले. आता किल्ल्यांची नासधूस त्यांनी केली कि आपण दुर्लक्ष केले हे माहित नाही. इंग्रज आले, राज्य करून गेले आणि अशी काय जादू करून गेले कि आम्हाला आमचा अभिमान असणाऱ्या किल्ल्या बद्दल काहीच वाटू नये. सध्या लोकांचा अभिमान फक्त बोलण्यात उरला आहे पण अभिमान वाटावा अशी कृती कधी आमच्या हातून होणार देव जाणे. मला आठवत आहे काही महिन्या पूर्वी सिंहगडावर गेलो होतो. गेलो होतो ह्याचा आनंद वाटत आहे पण केवळ पिकनिक साठी गेलो होतो त्याची लाज वाटत आहे. किल्ले हे आमच्या अभिमानाची, पूजनीय गोष्ट आहे पण आम्ही काय, तर पिकनिक म्हणून जातो. प्रेमीयुगुल काय, अश्लील चाळे करण्या साठी जातात. आपली नावे लिहित बसतात. खरतरं लाजा वाटल्या पाहिजेत नावे लिहिताना. ज्यांनी पराक्रम करताना, धारातीर्थ पडताना हा विचार केला नसेल कि माझा इथे पुतळा तरी किंवा नाव तरी कोरले जाणार आहे का? पण आम्ही मात्र अश्लील चाळे करून नावे लिहित बसतो. हे आमचे पराक्रम. पवित्र वास्तूची आम्ही आमच्याच हातानी विल्हेवाट लावत आहोत.

महाराज खूप दूरदृष्टीचा विचार करत होते. पण त्यांना अजून थोडी दूरदृष्टी असायला हवी होती, त्यांना तेव्हाच दिसले असते आपली नालायक जनता पुढे ह्याचे काही मोल ठेवणार नाही तर कशाला एवढी शत्रूशी खडाजंगी करायची. मिळालेल्या जहागिरीत काय कमी होते. आज त्यांनी आपल्या जनते साठी असामान्य पराक्रम गाजवले आणि आपण त्यांचे काय पांग फेडत आहोत.  "सयी बाई महाराजांना म्हणत असे कि तुमच्या प्रत्येक जिंकलेल्या किल्ल्याची पूजा आम्ही करणार" बिचाऱ्या सयी बाईंचे स्वप्न ते स्वप्नच राहिले. आणि आम्ही पूजा तर दूर त्यांच्या कडे साधे लक्ष देखील देत नाहीआज महाराज असते तर त्यांना अपार दुःख झाले असते किल्ल्यांची दुरावस्था पाहून. ज्या स्वराज्यासाठी किल्ले हे मोक्याचे होते आणि त्यासाठी असंख्य लोकांनी प्राण अर्पण केले त्या किल्ल्यांची हि अशी अवस्था. स्वराज्य आले पण किल्ले मात्र गेले. आणि असे अनेक विचार करत झोप कधी लागून गेली कळलेच नाही.
बघता बघता दिवाळी निघून पण गेली. आता फक्त दिवस शेवटचे सुट्टीचे उरले होते. डोक्यात सारखे किल्ल्यांबद्दल विचार येतच होते. त्या मुलाच्या एका साध्याश्या प्रश्नाने चांगलेच जागे केले होते मला. तेवढ्यातल्या तेवढ्यात गमतीशीर विचार मनात येउन गेला. आपले तंत्रज्ञान किती पुढे गेले आहे. मग एखादे असे तंत्रज्ञान का नाही येत जसे कम्प्युटर मध्ये आपला डेटा सेव्ह करता येतो, हिस्ट्री सेव्ह करता येते. किती छान झाले असते जर मला पण माझा अभिमानास्पद इतिहास नुसते कंट्रोल एस करून सेव्ह करता आला असता तर, जर मला माझे किल्ले एडीट करता आले असते तर. पूर्वी सारखे त्यांना छान सजवले असते आणि एकदाचे कंट्रोल एस करून त्यांना कायमस्वरूपी आहे तसे ठेऊन दिले असते. मग तिकडे लोकांनी काही का गोंधळ घालेना पण माझे किल्ले तर सुरक्षित राहिले असते. किल्ल्यांवर येण्यासाठी पासवर्ड ठेवला असता. जो कोणी सिक्युरिटी पॉलीसी ब्रेक करेल त्याला दंड केला असता. पण तेवढ्यात फोन वाजला आणि मी भानावर आलो.

आणि मला अचानक क्लिक झाले. हो, किल्ले जपण्या साठी तंत्रज्ञान आहे. पण ते कुठले मशीन नसून ते आपणच आहोत. आपल्याच पूर्वजांनी बांधलेले किल्ले आहेत त्याची काळजी घेण्या साठी आपल्या शिवाय दुसरे कोण असणार. जन्माला आलेले मूल वाढत असले तरी त्याला वाढवणारे त्याचे पालकच असतात. झाडे जगतात कारण निसर्ग त्यांना हवा आणि पाणी देतच असतो. मग आपणच बांधलेले किल्ले आपणच नाही का जपू शकत.

 आपण आताच किल्ल्यांची काळजी घेतली नाही तर इतिहासा प्रमाणे आपण दर दिवाळीत किल्ले बनवत तर राहू पण किल्ले मात्र इतिहासजमा होतील ह्यात शंका नाही. आणि "दिवाळीतच का किल्ला बनवायचा हा  प्रश्न" "किल्ला म्हणजे काय किंवा मला किल्ला कुठे पाहायला मिळेल" ह्या मध्ये रुपांतर होयला वेळ लागणार नाही.